
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे वाटप करताना काळजी घ्यावी – पालकमंत्री

नागपूर : शहरातील अतिक्रमणधारी झोपडपट्टीवासियांना जमिनीचे पट्टे वाटप करताना शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये शहरातील झोपडपट्टीवासियांना जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बैठकीला आमदार नागो गाणार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, प्रफुल्ल गुडधे पाटील आदी उपस्थित होते.
नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर बसलेल्या एकूण 60 झोपडपट्ट्यांबाबत चर्चा करण्यात आली. आमदार नागो गाणार यांनी यावेळी काही ठिकाणी शासन निर्णयानुसार पट्टे वाटप झाले नसल्याचे सांगितले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हस्तक्षेप करीत अशा पद्धतीने कुणावर अन्याय झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. सर्वांना न्याय्य पद्धतीने भूखंड वितरित करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांनी काही तक्रारी असल्यास लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांकडे यांच्याकडे मागणी नमूद करावी असेही त्यांनी सुचविले.
यावेळी सद्य:स्थितीमध्ये 26 झोपडपट्ट्यांबाबत कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर उर्वरित 34 झोपडपट्ट्यांमध्ये आरक्षणाने बाधित, रेल्वेबाधित, नालाबाधित, लेआऊट विकसित आदींमुळे पट्टे वाटप शक्य नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी काही नागरिकांनी आपल्या मागण्या पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या पुढे मांडल्या.








