
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


श्रीगोंदा(नगर):- न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगांव विद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सन १९७१ ते २०२० या वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा रविवार, दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यामुळे अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनी काही वर्षांनंतर एकमेकांना भेटले. या भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममान होताना डोळ्यांतून डोकावणारे अश्रूही अनेकांना थोपविता आले नाही.
कोरोनामुळे गावांतील काही लोकांचा मृत्यू झाला, यावेळी त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली. एकमेकांशी हितगूज करताना शालेय जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली. तसतसे भूतकाळात शिरताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यातील सुखानुभूतीचा प्रत्यय रोमांचित करून गेला. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. 'प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.तसेच शाळेच्या नवीन इमारतीचे जी+2 चे बांधकाम चालू आहे.या शाळेच्या बांधकामासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी लाखो रुपयांची देणगी दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी १९७१ च्या पहिल्या बॅचचे शाळेत पहिला नंबर प्राप्त केलेले माजी विध्यार्थी रसाळ होते.प्रमुख उपस्थिती म्हणून (साहाय्यक विभागीय अधिकारी,रयत शिक्षण संस्था अ.नगर) शिवाजीराव तापकीर हे होते.तसेच पहिल्या बॅचचे उपस्थित राहिलेल्या चार विध्यार्थ्यांचा सत्कार यावेळी विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.प्रारंभी न्यू इंग्लिश विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ बोडखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व एम.डी. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा.रसाळ व नंदिनी वाबळे यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी वैभव इथापे, शहाजी कुरूमकर, सुरज आंग्रे,लालासाहेब साळवे,संजय मांडे, उंडे यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष विक्रमसिंह वाबळे, थोर देणगीदार रविंद्रराव महाडीक,जिजाबापू शिंदे,सुभाष काका शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी वाबळे, बाबा शिर्के ,बाळासाहेब शिंदे , भगवान धावडे, दीपक गाडे, अमोल गाढवे, सचिन उंडे, लक्ष्मण मांडे,रायकर सर, बापूसाहेब वाबळे, राहुल साळवे, दत्तात्रय वाबळे, काळूराम ससाणे, बापु बर्डे तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन,व्हा.चेअरमन आदींसह माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








