
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
सिंधुदूर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय

सिंधुदूर्ग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय संलग्न करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२१-२२ मध्ये सुरु करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव 30 नोव्हेंबर २०२० पूर्वी केंद्र शासनास / राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगास सादर करण्यात येणार आहे.
राज्याच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत तसेच आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेली जागरुकता लक्षात घेऊन त्यानुषंगाने नवीन महाविद्यालय सुरु करणे गरजेचे आहे. राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा विचार करता सिंधुदूर्ग जिल्ह्यात देखील अतिविशेषोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंधुदूर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये 966.08 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह (किमान 20 एकर जागेसह) कायमस्वरूपी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निशुल्क वापरास हस्तांतरीत करण्यात येणार आहे.








