
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
किलबिल नेचर क्लबचे पक्षीनिरीक्षण शिबिर


गडचिरोली : पक्षीमहर्षी डॉ. सलीम अली यांची जयंती व अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यात प्रथमच साजऱ्या होणाऱ्या पक्षीसप्ताहादरम्यान क्रेन्स संस्थेच्या किलबिल नेचर क्लबच्या वतीने नुकतेच पक्षीनिरीक्षण शिबिर घेण्यात आले.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचा रोपवाटिकेचा परिसर तसेच चांदाळा मार्गावर भ्रमंती करून पक्षीनिरीक्षण करण्यात आले. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक मिलिंद उमरे यांनी विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांची ओळख करून देत पक्षीनिरीक्षण कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती दिली. या शिबिरात दयाळ, चिरक, लालबुड्या बुलबुल, सुभग, खाटिक, कोतवाल, कवडा, पारवा, थिरथिरा, चंडोल, निलपंख, सातभाई, वेडाराघू, अशा अनेक पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. याशिवाय राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन, लाईम बटरफ्लाय, कॉमन क्रो, कॉमन रोज, क्रिमसन रोज, स्ट्राईप टायगर, ब्ल्यू टायगर, इमिग्रंट, ग्रास ज्वेल अशा अनेक फुलपाखरांचीही माहिती देण्यात आली.
पक्षी हे निसर्गातील महत्वाचे घटक असून एकूण जैवविविधतेचे जतन करण्यासाठी त्यांना जपणे आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षण, संशोधन करून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी केले.
यावेळी इतर मान्यवरांनीही पक्षीनिरीक्षण व निसर्ग रक्षणाचे महत्त्व विशद केले. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या शिबिरातून खूप शिकायला मिळाल्याचे सांगत अशी शिबिरे नियमित आयोजित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्थानिक चांदाळा मार्गावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत आयोजित या कार्यक्रमाला दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक शेमदेव चाफले, पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे, गडचिरोली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, क्रेन्स संस्थेच्या सचिव तथा योगशिक्षिका अंजली कुळमेथे आदींची प्रमुख उपस्थिती होती.या शिबिरासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन हेमके व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.








