top of page

केमिकल कंपनीत स्फोट; सहा कामगारांचा मृत्यू

आज (शनिवार) सकाळी एका केमिकल कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये घडली आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत सहा कामगार गंभीररित्या भाजले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.



स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत सुमारे ४० ते ५० कामगार अडकले होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. जखमी कामगारांना कळबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरडा कंपनीतील बॉयलर अतिशय गरम होऊन अचानक स्फोट झाले असे प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे.

ree

या अपघातात मृत झालेल्या तसेच जखमी झालेल्या कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. दरम्यान गेल्या वर्षभरातील लोटे एमआयडीसीतील ही सहावी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या एमआयडीसीचे सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक आमदार योगेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

 
 
 

Comments


bottom of page