top of page

लसीकरणाची क्षमता व नियोजन लक्षात घेता महाराष्ट्राला अधिकचे दीड कोटी डोस द्या

आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली मागणी

ree

महाराष्ट्रात आजपर्यंत तीन कोटी तीस लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असून २६ जून रोजी राज्यात एकाच दिवशी ७ लाख ३८ हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले होते. जुलै महिन्यात महाराष्ट्राला केंद्राकडून १ कोटी १५ लाख लसींचा पुरवठा होणार आहे. लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता व नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्यात यावेत अशी मागणी आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे २ जुलै रोजी एका पत्राद्वारे केली आहे.

केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा केल्यास राज्यातील लसीकरण नियोजित वेळेत पूर्ण करता येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी पुरेशी लसीकरण केंद्रे तसेच लसीकरण नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात देशभरात १२ कोटी लस डोस वितरण होणार असून त्यापैकी १ कोटी १५ लाख डोसेस महाराष्ट्राला दिले जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात जुलै महिन्यात रोज सरासरी ३ लाख ७० हजार लोकांचे लसीकरण होऊ शकते. आरोग्य विभागाने रोज १० ते १२ लाख लोकांच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे व आवश्यकतेनुसार १५ लाख लोकांना रोज लस देता येईल असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाणही अन्य राज्याच्या तुलनेत अत्यल्प आहे.


 
 
 

Comments


bottom of page