top of page

अंडर १९ वर्ल्डकप : इंग्लंडला हरवून भारताने पाचव्यांदा विश्वचषक जिंकला!

अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला ४ गड्यांनी पराभव करत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. भारत पाचव्यांदा अंडर १९ विश्वविजेता ठरला आहे. या विजयात निशांत सिंधु, शेख रशिद , राज बावा, यांनी बहुमोल कामगिरी बजावली. या पूर्वी भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ ची विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. या कामगीरीबद्दल १९ वर्षाखालील संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताच्या या विश्वविजेत्या खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे.

ree

अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. भारताच्या रवी कुमारने सलामीवीर जेकब बेथेल (२) आणि कर्णधार टॉम प्रिस्ट (०) यांना स्वस्तात तंबूत धाडले. तर सलामीवीर जॉर्ज थॉमसला (२७), विल्यम लक्सटन (४) आणि जॉर्ज बेल (०) राज बावाने झेलबाद केले. इंग्लंडने ४७ धावांवर ५ फलंदाज गमावले. त्यानंतर राजने इंग्लंडला अजून एक धक्का दिला. त्याने रेहान अहमदला (१०) कौशल तांबेकरवी झेलबाद करत आपला चौथा बळी नोंदवला. इंग्लंडच्या ७ बाद ९१ धावा असताना जेम्स रियूने तळाचा फलंदाज जेम्स सेल्ससह ९३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. जेम्स रियूने एका बाजूने किल्ला लढवत १२ चौकारांसह ९५ धावां केल्या. इंग्लंडचा संघ १८९ धावांत आटोपला. भारताकडून राज बावाने ३१ धावांत ५ बळी घेतले, तर रवीकुमारने ४ बळी घेतले.


इंग्लंडने दिलेल्या १९० धावांचा पाठलाग करताना भारताचीही सुरुवात खराब झाली. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी शून्यावर बाद झाला. त्यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशीदने ४९ धावांची भागीदारी केली. थॉमस ऍस्पिनवॉलने (२१) हरनूरला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर रशीदने यश धुल सोबत ४६ धावांची भागीदारी केली. हे दोघे संघाला विजय मिळवून देणार असे वाटत असताना मागील सामन्यात शतकी खेळी करणारा कर्णधार यश धुल १७ धावांवर बाद झाला. जेम्स सीलने यश आणि रशीदला झेलबाद केले. रशीदने ६ चौकारांसह ५० तर यशने १७ धावा केल्या. यानंतर राज बावा आणि निशांत सिंधू यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करत डाव सावरला. विजयासाठी २५ धावा असताना बावा (३५) बाद झाला. १७६ धावांवर भारताचे ६ फलंदाज माघारी परतले. मात्र निशांत सिंधुने अर्धशतक झळकावत भारताला विजयाजवळ पोहोचवले. यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बानाने ४८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. निशांतने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५० धावांची खेळी केली, तर बाना १३ धावांवर नाबाद राहिला.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विश्वविजेत्या प्रत्येक खेळाडूला ४० लाख आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला २५ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. तुम्ही अभिमानास्पद कामगिरी केल्याचे शाह यांनी ट्वीटमध्ये म्हटले.




 
 
 

Comments


bottom of page