top of page

... अन् आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मागितली माफी

परभणी : राज्यात शनिवार आणि रविवार ( दि. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र .न्यासा या संस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 'विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल मी आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून तुमची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो.' असे आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले.

ree

परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवलेल्या न्यासा या संस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गट क आणि गट ड च्या जागा भरण्यासाठी आरोग्य विभागाचे सेवा प्रवेश नियमानुसार भरण्यात येणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरुपात घेण्यासाठी कार्यपद्धती आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्यास सांगितलं आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने डेमो आणि परीक्षा घेऊन न्यासाची निवड केली. त्या संस्थेसोबत करार करण्यात आल्याचे राजेश टोपे म्हणाले.

आरोग्य विभागाची जबाबदारी फक्त प्रश्न पत्रिका तयार करणं हीच आहे. आरोग्य विभागाने तयार केलेली प्रश्नपत्रिकांची छपाई, त्यांचे वितरण, राज्यात लागणारी केंद्र तयार करणे, तिथले व्यवस्था पाहणे, स्टिकर्स, नंबर याची सर्व खातरजमा करणे इत्यादी कामे ही संबंधित संस्थांची असतात. इलेक्ट्रिक उपकरणांच्या सहाय्याने होणारे गैरप्रकार रोखणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलं. आऱोग्य विभाग याचा सातत्यानं आढावा घेत होतं. जेव्हा दिरंगाई जाणवली तेव्हा संबंधितांना विचारणाही केली. तर त्यांनी खात्री दिली होती. मी स्वत: जेव्हा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी शुक्रवारपर्यंत सर्व होईल असं सांगितलं.

मात्र ऐनवेळी व्यवस्थेत त्रुटी असल्याचं समोर आल्याचंही राजेश टोपे म्हणाले. याबाबत त्यांनी एक उदाहरण सांगताना म्हटलं की, एका ठिकाणी हजार मुलांना बसण्याची यादी दिली पण बसण्याची व्यवस्था सहाशे सातशे इतकी होती. उर्वरित मुलांच्या बैठकीचा प्रश्न होता. पूर्ण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसून पुन्हा आढावा घेतला असता अनेक त्रुटी आढळल्या. बसण्याची बैठक व्यवस्था अपुरी असल्याचं दिसून आल्याचंही टोपे यांनी सांगितले.


माझा हेतू स्पष्ट आणि प्रामाणिक आहे. भरतीप्रक्रियेसाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव घेऊन गेलो आणि याला मान्यता मिळवून घेतली. आरोग्य विभागातील वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या जागा आणि त्या संदर्भातील निर्णय़ घेण्यात आला होता. ही परीक्षा लवकरात लवकर ,आठवड्याभरात किंवा दहा दिवसात घेण्यासाठी प्रयत्न करेन असं आश्वासनही यावेळी राजेश टोपेंनी दिलं.



Comments


bottom of page