top of page

‘तौत्के’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रिय झालं असून, गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेनं सरकण्यास सुरूवात झाली असून, येत्या काही तासांत कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

ree

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे, अशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असे, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.


कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मोठ्या पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. तर कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी आणि तीव्र वादळ असणार आहे. रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशार देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटक्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातही तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तौत्के चक्रीवादळ तयार होऊन पुढील २४ तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तर-वायव्येकडे सरकणार असून, १७ मे रोजी रात्री ९ ते १२च्या दरम्यान ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहचण्याचा अंदाज आहे. गुजरातजवळ अतितीव्र स्वरूपात असणाऱ्या चक्रीवादळाच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत पोहचू शकतो.

 
 
 

Comments


bottom of page