top of page

... दिखाऊपणा टाळायला पाहिजे होता

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे-पाटील यांना फटकारले

पुढील सुनावणी 5 मे रोजी

ree

औरंगाबाद : विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शनाचा साठा व वाटप केल्याप्रकरणात अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती भालचंद्र यू. देबदार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान "एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही", अशा शब्दांत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांच्यावर ताशेरे ओढले.


सुजय विखे-पाटील यांचे वकील शिरीष गुप्ते यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, माझ्या अशिलाची कृती ही कोणत्याही अंगाने गुन्हेगारी प्रकारात मोडत नाही. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी चार्टर्ड विमानाने परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्स आणली. मला मान्य आहे की, हे फाजील धाडस होते, पण हा गुन्हा ठरत नाही, असा बचाव गुप्ते यांनी केला. या सुनावणीदरम्यान सुजय विखे-पाटील यांनी 10 हजार नव्हे तर फक्त 1200 इंजेक्शन्स आणल्याचे स्पष्ट करण्यात आले.


यावर न्यायमूर्ती घुगे यांनी खडे बोल सुनावतले. "तुमच्या अशिलाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विमानातून उतरल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स उतरवताना व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा त्यांनी करायला नको होता. मतदारसंघांमधील लोकांसाठी मी कशाप्रकारे स्वत:चे वजन वापरून दिल्लीतून इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा त्यांनी टाळायला पाहिजे होता", असे न्यायमूर्ती घुगे यांनी म्हटले.


दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सुधारीत याचिकेत कोविड -१९ च्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या वाटपाबाबत अन्य राजकीय नेत्यांवरसुद्धा कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार असून त्यावेळी हा खटला फौजदारी असणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. प्रज्ञा तळेकर, ऍड. अजिंक्य काळे, ऍड. उमाकांत आवटे व ऍड. राजेश मेवारा काम पहात आहेत, तर सरकारच्या वतीने ऍड. डी. आर. काळे बाजू मांडत आहेत.


 
 
 

Comments


bottom of page