top of page

'सीडीआर'वरून काँग्रेसने फडणवीसांना घेरले!

मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेल्या अटकेनंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआर (कॉल रेकॉर्ड डिटेल्स) च्या आधारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. आता त्याच 'सीडीआर'वरून काँग्रेसनं फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे.

ree

'देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणं त्यांचं कर्तव्य आहे,' असं सावंत यांनी म्हटलं आहे. 'सीडीआर मिळवणं हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने सीडीआर रॅकेट उघडकीस आणलं होतं, असं सांगून, फडणवीस यांनी गुन्हा केल्याचा आरोप सावंत यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यासाठी त्यांनी काही बातम्याची कात्रणंही ट्वीट केली आहेत.

'नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये. स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार करतील हा विश्वास आहे व विनंतीही आहे,' असा टोलाही सावंत यांनी हाणला आहे.

 
 
 

Comments


bottom of page