top of page

लग्न जमत नसल्याने ड्रायव्हरने चोरले मालकाच्याच घरातील दहा लाख रुपये

घरची परिस्थिती हलाकीची असल्याने लग्न जमत नव्हते. पगारही कमी...स्वत:ची गाडी घेऊन भाड्याने देण्याचे स्वप्न ... आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लग्न जमेल, या विश्वासाने एका ड्रायव्हरने मालकाच्याच घरातील दहा लाख रुपये चोरल्याची घटना सोलापूर शहरात घडली. नागेश उर्फ अमित सुर्यकांत भरडे (रा. उत्तर कसबा, टिळक चौक) असे त्या ड्रायव्हरचे नाव आहे. पोलिसांनी त्याला जेरबंद केले असून त्याच्याकडील रक्कम हस्तगत केली आहे.

ree


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नागेश उर्फ अमित सुर्यकांत भरडे हा चालक म्हणून काही महिन्यांपासून संतोष विजयकृष्ण कुलकर्णी (रा. जुळे सोलापूर, सानवी अपार्टमेंट) यांच्याकडे कामाला होता. शेतीच्या उत्पन्नातून आलेले दहा लाख रुपये संतोष कुलकर्णी यांनी सानवी अपार्टमेंटमधील घरात ठेवली होती. ते सध्या इंद्रधनू अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. सानवी अपार्टमेंटमध्ये त्यांचे येणे-जाणे होते. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी कुलकर्णी यांनी घरातील रोकड तपासली असता त्यांना रक्कम दिसलीच नाही. त्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलिसांत धाव घेतली. गुन्हे शाखेनेही संशयिताचा शोध सुरु केला.

पोलिसांनी कुलकर्णी यांच्या घरी ये-जा करणाऱ्यांकडे विचारपूस केली. त्यावेळी त्यांचा चालक नागेश भरडे याचा फोन बंद लागल्याने त्याच्याबद्दल संशय बळावल्याने पोटफाडी चौकातून त्याला जेरबंद केले आणि त्याच्याकडील १० लाख रुपये हस्तगत केले.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकातील राजु मुदगल, कुमार शेळके, महेश शिंदे, कृष्णात कोळी, सिद्धाराम देशमुख, प्रवीण शेळकंदे, रत्ना सोनवणे, सतिश काटे यांनी ही कामगिरी पार पाडली.



 
 
 

Comments


bottom of page