top of page

भाजपचं ओळखपत्र दाखवा अन् पेट्रोल मोफत मिळवा...

सिंधुदुर्ग: शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन. या निमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) , तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नाईक यांनी ट्विट करत दिली.

ree

कुडाळ येथील शेतकरी संघासमोरील भारत पेट्रोल पम्पावर सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैभव नाईक यांच्या या उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरुन शिवसेना आणि भाजप समर्थक पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने डोंबिवलीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून माफक दरात पेट्रोल वाटप करण्यात आले होते. एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन शिवसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे केंद्र सरकारला चपराक देण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. त्यामुळे उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.


 
 
 

Comments


bottom of page