top of page

अनर्थ टळला ! ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड; १५ रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविले

सातारा : देशभरात ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असतानाच सातारा जिल्ह्यात रुग्णालय प्रशासनाने वेळीच तातडीने पावले उचलल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जिल्ह्यातील औंध ग्रामीण रुग्णालय येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी रात्री ऑक्सिजन पुरवठा विभागात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच खबरदारी म्हणून १५ रुग्णांना तातडीने वडूज व मायणी येथील खासगी व शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास साळुंखे यांनी दिली.

ree

औंधसह खटाव तालुक्यातील रुग्णांसाठी औंध येथील ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून याठिकाणी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील दीड महिन्यापासून हे कोविड सेंटर सुरळीत सुरू आहे मात्र, मंगळवारी रात्री उशिरा अचानक ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला. रुग्णालय प्रशासनाने वेळीच तातडीने पावले उचलत उपचार घेत असलेल्या व ऑक्सिजनवर असलेल्या ४० ते ६५ वयोगटातील १५ रुग्णांना वडूज व मायणी येथे हलविण्यात निर्णय घेतला. रुग्णांना वेळेवर दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यामुळे नातेवाईकांसह सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला.


 
 
 

Comments


bottom of page