top of page

कोरोना रूग्ण जास्त असलेल्या गावात निर्बंधांचे काटेकोर पालन होण्याबाबत पोलिसांनी दक्षता घ्यावी

सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ज्या गावात कोरोना बाधित रूग्णांची संख्या जास्त आहे, अशा प्रत्येक गावात प्रशासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन होण्याबाबत पोलीस विभागाने अधिक सतर्कता बाळगून दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

ree

कडेगाव येथील तहसील कार्यालयात कोविड-19 आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, नगराध्यक्षा संगीता राऊत, मुख्याधिकारी कपिल जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. यावेळी त्यांनी कडेगाव तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची सद्यस्थिती, उपलब्ध बेड्स, उपचार सुविधा, लसीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, दक्षता समितीचे कामकाज याबाबत सविस्तर आढावा घेवून कडेगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, पॉझिटिव्ह रूग्णांचे अलगीकरण यावर भर द्यावा. लसीकरणाचे योग्य नियोजन करावे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी. यावेळी तालुकास्तरावर सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेसाठी कडेगाव व्यापारी असोसिएशनतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन सुपूर्द करण्यात आली. यावेळी कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी तालुक्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर सादरीकरण केले.


 
 
 

Comments


bottom of page