top of page

...... महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, असं फडणवीस मोदींना सांगतील का?

मुंबई: सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको, अशी भूमिका मांडली. लोकांना लॉकडाऊन नको, असे त्यांनी सांगितले. हे अगदी योग्य आहे. मात्र, ही गोष्ट सरकारलाही माहिती आहे. पण मग लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय फडणवीसांकडे आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, असं फडणवीस मोदींना सांगतील का, असा खोचक सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला. खासदार राऊत यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ree

सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचाच मार्ग वापरला जात आहे. तसेच जास्तीत जास्त लसी आणि रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध करुन देणे, ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. पुण्यात भाजपचा महापौर असल्याने केंद्र सरकारने थेट तिकडे लसींचा साठा पाठवला. हा खोटारडेपणा झाला. पुण्याला लसी मिळत असतील तर मुंबईलाही मिळाल्या पाहिजेत. अन्यथा राजू शेट्टी यांनी म्हटल्याप्रमाणे सीरम इन्स्टिट्यूटमधून लसीचा एक ट्रकही बाहेर पडू देणार नाही, ही भावना लोकांच्या मनात वाढीस लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.


देशातील तसेच राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. अशावेळी राजकारण करणं कोणालाही शोभत नाही. लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या औषधांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होणे योग्य नाही. फक्त गुजरात तुमचा नाही तर संपूर्ण देश तुमचा आहे. तुमचे गुजरातवर अधिक प्रेम आहे, हे समजू शकतो. पण आपण देशाचे पंतप्रधान आहोत, ही गोष्ट नरेंद्र मोदी यांनी लक्षात ठेवायला हवी, असे राऊत यांनी म्हटले.





 
 
 

Comments


bottom of page