top of page

प्रेमासाठी ... स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव, दहावाही उरकला!

पुणे : प्रेयसीसोबत राहण्यासाठी ६५ वर्षांच्या वृद्धाने स्वत:च्याच अपघाती मृत्यूचा बनाव केला. त्यासाठी त्याने एका व्यक्तीचा खून करून डोके धडापासून वेगळे केले आणि त्याला स्वतःच्या अंगावरील कपडे त्याला घालून रोटर मध्ये फिरवले आणि अपघाती मृत्यूचा बनाव केला. आळंदी पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. रवींद्र भिमाजी घेनंद (वय ४८, रा. धानोरे, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय ६५, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना चऱ्‍होली खुर्द येथे १६ डिसेंबर रोजी रात्री घडली होती.

ree

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी सुभाष थोरवे याचे स्वतःचे शेत आहे. रवींद्र घेनंद आणि त्याची चांगली ओळख होती. आरोपीचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे आरोपीला महिलेसोबत लांब कुठे तरी जाऊन राहायचे होते. त्यामुळे स्वतःचा मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याने घेनंद यांना गोड बोलून शेतामध्ये नेले. त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत मानेपासून डोके वेगळे करून त्यांचा खून केला. त्यानंतर, स्वतःच्या अंगावरील कपडे घेनंद यांच्या मृतदेहावर घालून त्यांना रोटर मध्ये घालून फिरवले आणि स्वतःच्याच अपघाती मृत्यूचा बनाव केला. त्यानंतर आरोपी फरार झाला होता, तसंच त्याच्यावर मृत्यूनंतर केले जाणारे सगळे विधीही करण्यात आले. अगदी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचे बॅनरही गावात लावण्यात आले आणि दशक्रिया विधीही उरकला गेला.

पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे जिवंत असल्याचं समजलं. यानंतर पोलिसांनी तपास केला तेव्हा हा आरोपी पोलिसांना दुसऱ्या गावात सापडला. तो थोरवे असल्याचे निष्पन्न झाले. आळंदी पोलिसांकडून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


 
 
 

Comments


bottom of page