top of page

भररस्त्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात भरदिवसा रस्त्यावर कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण एमआयडीसी भागातील महाळुंगे येथील पोलीस चौकी पासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर शुक्रवारी (दि. १४ मे ) ही घटना घडली. अतुल तानाजी भोसले (वय २८) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये निर्घृणपणे हत्या केली जात असल्याचं दिसत आहे.

ree

अतुल भोसले हा महाळुंगे परिसरातील एका कंपनीत दोन टँकरने पाणी पुरवठा करत होता. दरम्यान, कंपनीत पाणी पुरवठा करण्यावरून आरोपी अक्षय शिवले याने मयत अतुल भोसले याना फोन करून मला त्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे असे सांगितले. यावरून त्यांच्यात फोनवरच वाद झाला. त्यानंतर दुपारच्या सुमारास महाळुंगे येथील ममता स्वीट दुकानासमोर अतुल भोसले याला गाठून त्याच्यावर इतर साथीदारांच्या मदतीने कोयत्याने वार केले. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या अतुल भोसले यांना चाकण मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना शुक्रवारी रात्रीच आदित्य बिर्ला रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या अतुल भोसले यांचा शनिवारी १५ मे रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


या घटनेप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे अशी माहिती महाळुंगे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि इतर तीन साथीदार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
 
 

Comments


bottom of page