top of page

पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सोमवारपासून होणार सुरु

पुणे : जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील चांगले असल्याने जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते.

ree

उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यात लसीकरणाला चांगली गती देण्यात आली आहे. लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविड संसर्गाचे प्रमाणदेखील नियंत्रणात असल्याने सोमवारपासून महाविद्यालये सुरू करण्यात यावीत. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालय परिसरात प्रवेश देण्यात यावा. महाविद्यालय व्यवस्थापनाने कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील.


जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद असल्याने लहान व्यावसायिकांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. कोविड स्थिती नियंत्रणात असल्याने पर्यटनस्थळेदेखील सोमवारपासून सुरू करण्यात यावीत. पर्यटकांना मास्क घालणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे बंधनकारक करावे. सोमवारपासून शासकीय कार्यालयांप्रमाणेच खाजगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीने सुरू ठेवण्यास आणि हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात यावी. राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्रशिक्षण केंद्रेदेखील सोमवारपासून सुरू करण्यात यावीत.


कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून ही चांगली बाब आहे. मात्र येणाऱ्या सण-उत्सवाचा कालावधी लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घेण्यासाठी कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. लशीची दुसरी मात्रा न घेतलेल्या नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात यावे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागात लसीकरणाची विशेष मोहीम घेण्यात यावी. घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात यावे. येत्या 22 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण वाढविण्याच्या सूचनादेखील श्री.पवार यांनी दिल्या.


विभागीय आयुक्त श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. कोविड संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करीत असून त्यामुळे पॉझिटीव्हीटी दर नियंत्रणात आहे. येत्या सण-उत्सवाच्या कालावधीत संसर्ग वाढू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मागील आठवड्यात 2 हजार 584 कारवाई करून 9 लाख 60 हजार दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 3.01 एवढा असून मागील आठवड्यात 3 हजार 897 नवे बाधित रुग्ण आढळले तर 4 हजार 382 रुग्ण कोरोना मुक्त झाले. जिल्ह्यात कोरोना मुक्तीचे प्रमाण 98 टक्के असून मृत्यूदर 1.6 टक्के आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.


बैठकीस खासदार गिरीश बापट, पुणे मनपा महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव ,. आमदार ॲड. अशोक पवार, सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, दिलीप मोहिते, वल्लभ बेणके, मुक्ता टिळक, यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम्, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 
 
 

Comments


bottom of page