top of page

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात येत असून मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘एक दोन तीन चार’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये पटवर्धन यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली होती.

गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. त्यानंतर व्यावसायिक नाटकाकडे ते वळले. अनेक मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातली पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती. या नाटकाचे तब्बल दीड हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले.




Comments


bottom of page