top of page

... तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही

पुणेः राज्यभरात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजपच्यावतीने चक्का जाम आंदोलन केले जात आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कात्रज चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 'ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही,' असा इशारा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला.

ree

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली. “अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, छोटे मन से कोई बडा नही होता, टूटे मन से कोई खडा नही होता. या सरकारला मला सांगायचंय की एवढं छोटं मन ठेऊन तुम्ही मोठे होऊ शकत नाहीत. चुकून तुम्ही राजकारणात आलात. भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.त्याचबरोबर, मी ओबीसींना सांगू इच्छिते, आपलं मन तुटू देऊ नका. संघर्षाची भावना तुटू देऊ नका. ओबीसींच्या पाठीमागे भाजपा खंबीरपणे उभी आहे,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


मी मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा ओबीसींचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती गेले होते. याच्याविषयी कोर्टाच्या तारखा चालू होत्या ते आरक्षण कसे योग्य आहे हे सांगण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये काही डाटा सबमिट करत होतो. आम्ही काही सर्व्हेदेखील करत होतो. तेवढ्यात आचार संहिता लागली त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि जवळपास पंधरा महिने झालं हे सरकार फक्त कोर्टाकडून तारखाच घेत आहे. इंपिरिकल डेटाच्या आधारे कृष्णमूर्ती यांच्या मतांच्या आधारावर सरकारने हा सगळा डाटा सबमिट करावा असं त्यांनी सांगितलं पण या सरकारने पंधरा महिन्यांमध्ये कुठलाही डाटा तयार केला नाही,' असा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर देखील टीका केली. “ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही चक्काजाम जाहीर केला, तर सरकारी पक्ष देखील आंदोलनाची भाषा करायला लागले. मंत्री असताना आंदोलनाची भाषा करणं तुम्हाला शोभतं का? मंत्र्यांनी निर्णय करायचे आहेत, आंदोलन करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो हे तुमच्या नाकर्तेपणामुळे झालं आहे”, असा टोलाही लगावला आहे.



 
 
 

Comments


bottom of page