top of page

राष्ट्रवादीची पूरग्रस्तांना मदत; नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळावेत

मुंबई : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना राष्ट्रवादीकडून करण्यात येत असलेल्या मदतीची माहिती दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असं आवाहन पवार यांनी केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. सहा जिल्ह्यात जवळपास 16 हजार कुटुंबांना फटका बसला आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत या 16 हजार कुटुंबांना मदत केली जणार आहे. 16 हजार कुटुंबासाठी 16 हजार किट्सचं वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये भांडी, मास्क, पांघरुन आणि इतर जीवनावशक वस्तूंचा समावेश असेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथकं पाठवली जाणार आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

पूरग्रस्त भागात नेत्यांचे दौरे सुरू असून, त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले, कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. पण ज्यांचा त्या भागात संबंध नाही त्यांनी दौरे टाळावेत, असं आवाहन शरद पवार यांनी केलं..


राज्यपाल पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर जाणार आहेत याबाबत विचारलं असता पवारांनी सूचक प्रतिक्रिया दिली. 'राज्यपाल आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते केंद्राकडून जास्त मिळवून देतील अशी आशा आहे, असेही शरद पवार म्हणाले.



 
 
 

Comments


bottom of page