top of page

भाजपच्या "या" नेत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह केला राष्ट्रवादीत प्रवेश

पक्षप्रवेश करण्यासाठी तब्बल पाच तास वाट पहावी लागली; रात्री १२ वाजता जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बिज्जू प्रधाने यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

ree

भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांनी रविवारी (दि,२० ) कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिज्जू प्रधाने यांनी शेक़डो समर्थकांसह सोमवारी,रात्री १२ वाजण्याच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांना तब्बल पाच तास वाट पहावी लागली. रात्री १२ वाजता झालेल्या या राजकीय प्रवेशाची चर्चा सोलापूर शहरातच नाहीतर राज्यभरात रंगली आहे.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'बिजू अण्णा ज्या पक्षात काम करत होते, तिथे कार्यकर्त्यांना गरजेपुरते वापरून बाजूला सारण्याची प्रथाच आहे. कार्यकर्त्यांकडून काम करून घेणे आणि गरज संपली की कार्यकर्त्याला सोडून देणे ही प्रथा राष्ट्रवादीत कधीही होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांनाच योग्य वागणूक मिळते, भाजपमधील अनेक लोकांना पक्ष सोडायचा आहे. बिजू प्रधाने यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता अनेकजण राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतील.



“भाजपातून काही प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. त्यांनी मला येथे येण्यासाठी विनंती केली होती. पण माझ्या मतदारसंघातील एका जवानाला वीरमरण आलं आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावल्याने मला येथे येण्यास उशीर झाला. ७ वाजताच हा कार्यक्रम होणार होता, पण उशीर झाला”, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. 


कोण आहेत बिज्जू प्रधाने ?

बिज्जू प्रधाने हे भाजपचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक तसेच भाजपचे शहर सरचिटणीस होते,. २५ वर्षांपासून ते भाजपमध्ये असून संघटन सरचिटणीसनंतर त्यांच्याकडे शहर भाजपचे सरचिटणीसपद सोपविण्यात आले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभारली. २०१२ आणि २०१७ मध्ये पक्षाने त्यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली, परंतु त्यांना यश मिळाले नाही. काही दिवसांपासून ते नाराज होते. आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते पुन्हा पक्षात सक्रिय झाले. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधाने यांनी रविवारी (दि,२० ) कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आता राष्ट्रवादी प्रवेश केल्याने त्यांना कोणत्या प्रभागातून उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



 
 
 

Comments


bottom of page