top of page

अपघातानंतर खासगी बसला भीषण आग; ११जणांचा मृत्यू

यवतमाळहून मुंबईकडे जात असलेल्या खासगी बसचा आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. नाशिक येथील नांदूर नाक्याजवळील मिरची चौकात हा अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतला. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बसच जळून खाक झाली. या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. नाशिक येथील नांदूर नाक्याजवळील मिरची हॉटेल येथे पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान या बसला ट्रेलरने धडक दिली. या झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. गाढ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश कोळसा झाला. काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झाले. अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातातील जखमी व मृत व्यक्ती विषयी अधिक माहिती संबंधितांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहिती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.


 
 
 

Comments


bottom of page