top of page

Video : समुद्रकिनाऱ्यावर आढळला ‘चेंडू’सदृश्य धातूचा मोठा गोळा; एलियन्सची तबकडी की बॉम्ब?

जपानच्या शिजुओका प्रांतातील हमामात्सु शहराच्या एंशुहामा समुद्रकिनाऱ्यावर एक ‘चेंडू’सदृश्य धातूचा गोळा सापडला. मंगळवारी सकाळी स्थानिक रहिवाशी समुद्रकिनारी फेरफटका मारत असताना त्यांना दीड मीटर व्यास असलेला हा गोळा पहिल्यांदा दिसला. हा धातूचा गोळा दुसऱ्या महायुद्धातील एखादा बॉम्ब असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे, काही जण याला एलियन्सची उडती तबकडी असावी, असेही म्हणत आहेत. शहरातील लोकांना एंशुहामा समुद्रकिनारी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिकांना याठिकाणी प्रवेशबंदी करुन पोलीस पुढील तपास करत आहेत.



जपानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळ्याचा व्यास दीड मीटर (४.९ फूट) इतका आहे. हा गोळा धातूचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना धातूचे हुक देखील आहेत. या चेंडूची आता बॉम्ब विरोधी पथकाकडून पडताळणी करण्यात येत आहे. जपानच्या सेल्फ डिफेंस फोर्सला याठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मात्र अद्याप हा चेंडूसदृश्य गोळा इथे कसा पोहोचला? नक्की यामध्ये काय आहे? याचा तपास लागू शकलेला नाही.


जपान सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र जपानमधील नागरिकांमध्ये या गोळ्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, शत्रू राष्ट्रांची ही काहीतरी खेळी असावी तर काहींना वाटतंय की एलिएन्स पुन्हा पृथ्वीवर आले असावेत. एवढा मोठा धातूचा गोळा समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यामुळे आश्चर्यही व्यक्त होत आहे.


Comments


bottom of page