top of page

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून ४ वर्षीय चिमुकलीचा चुलत्यानेच केला खून

शेतजमिनीच्या वादातून चुलत्यानेच आपल्या चार वर्षीय चिमुकल्या पुतणीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात सोमवारी (दि. २०) ही घटना घडली आहे. ज्ञानदा यशोधन धावणे (वय -४ वर्षे, रा. डीकसळ, ता. मोहोळ) असे मयत चिमुकलीचे नाव आहे.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, यशोधन शिवाजी धावणे यांची वडिलोपार्जित १६ एकर शेतजमीन आहे. यातील पाच एकर ही त्यांच्या नावे, पाच एकर भाऊ यशोदीप यांच्या नावे तर उर्वरित सहा एकर जमीन ही आईच्या नावे आहे. आईच्या नावावर असलेली सहा एकर शेतजमीन माझ्या नावावर करून द्या म्हणून यशोदीप घरात सारखी भांडणे करीत होता. गावातील लोकांनी मध्यस्थी करत यशोदीप ची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता.

याच कारणावरुन सोमवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी यशोदीप आणि यशोधन या दोन्ही भावात पुन्हा एकदा भांडण झाले. आईच्या नावावर असलेली जमीन वाटणी न करण्यात तुम्ही पती-पत्नी जबाबदार आहात. त्यामुळे मी तुमचा वंशजच जिवंत ठेवत नाही अशी धमकी यशोदीपने दिली गावातील लोकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. त्यानंतर चिमुकली ज्ञानदाला घरात झोपवून यशोधन हे आई आणि पत्नीसह शेतात कामासाठी गेले. शेतातून घरी परतल्यानंतर त्यांना ज्ञानदा तिथे दिसली नाही. मात्र ज्ञानदा घरात नसल्याने त्यांनी आसपास चौकशी केली असता भाऊ यशोदीपने ज्ञानदाला गाडीवर नेल्याचे काही जणांनी सांगितलं.



यशोधनने यशोदीपला फोन लावून 'माझ्या मुलीला कुठे पाहिलेस का?' असे विचारले असता, मी तिला जीवे मारून मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिले असल्याचे सांगितले. यशोधन यांना हे ऐकल्यानंतर धक्का बसला. त्यांनी तात्काळ मालिकपेठला धाव घेतली. मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात चिमुकल्या ज्ञानदाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला..

या प्रकरणी यशोदीप धावणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
 
 

Comments


bottom of page