top of page

‘तारक मेहता…’मधील ‘बबीता’ला जातीवाचक शब्दाचा उल्लेख करणं पडलं महागात

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी मुनमुनने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र जातीवाचक शब्दाचा उल्लेख केल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी मुनमुन दत्ताला हरियाणा पोलिसांनी अटक केली. सुमारे चार तास तपास अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली.

ree

९ मे २०२१ रोजी मुनमुन दत्ताने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ती म्हणाली, ‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचे आहे. मला *----* सारखे दिसायचे नाही’ असे तिने म्हटले होते. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला अटक करण्याची देखील मागणी केली होती. १३ मे रोजी हांसी येथे तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२८ जानेवारी २०२२ रोजी हिस्सार येथील एससी एसटी कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने मुनमुन दत्ताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तिने अटकपूर्व जामिनासाठी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हायकोर्टाने अभिनेत्रीला हांसी येथील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून तपासात सहभागी होण्यास सांगितले होते. त्यानुसार दत्ता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाली. मुनमुन दत्ताला अटक करून चौकशी केल्यानंतर अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली.

दरम्यान मुनमुन दत्ताला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ माफी मागितली होती. मात्र तिच्या या माफीनामानंतरही अनेकजण तिला ट्रोल करताना दिसत आहे.


 
 
 

Comments


bottom of page