top of page

पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांच्या वसुलीची मोहीम वेगात; शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 31 लाख 37 हजार 350 वीजग्राहकांकडे 1290 कोटी 68 लाख रुपयांची थकबाकी असल्याने वसुली मोहिमेला वेग देण्यात आला आहे. सुटीच्या दिवशी ही मोहीम सुरु राहणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ree

दरम्यान, चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 26) व रविवारी (दि. 27) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

पुणे प्रादेशिक विभागात लघुदाब वर्गवारीमध्ये सद्यस्थितीत लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा (14,29,383)– 679 कोटी 51 लाख, सातारा (3,77,050)– 77 कोटी 56 लाख, सोलापूर (4,47,720)– 181 कोटी 61, सांगली (3,56,520)– 125 कोटी 54 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात (5,26,720)- 226 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या वर्षभरापासून वीजबिलांचा व थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. महावितरणची आर्थिक भिस्त केवळ वीजबिलांच्या वसुलीवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.


 
 
 

Comments


bottom of page