top of page

मिताली राज ठरली 10,000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू!

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तर हा टप्पा पार करणारी मिताली ही जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे!

ree

याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र, १० हजार २७३ धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी मितालीला आणखी २७२ धावांची गरज आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीनं ३५ धावा करताच १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. मितालीने १- हजार धावा करताच BCCI नं ट्वीट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

मितालीनं १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत ३१० सामने खेळले आहेत. त्यापैकी १० कसोटी सामने, २११ एकदिवसीय सामने तर तब्बल ८२ टी २० सामन्यांचा समावेश आहे. १९९९मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जवळपास २२ वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.


क्रिकेटच्या इतिहासात मिताली सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू असून २००हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे. त्याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ हजार ९७४ धावांचा विक्रम तिच्या नावावर आहे.


 
 
 

Comments


bottom of page