top of page

मराठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी; मनसेकडून कास्टिंग काऊचचा पर्दाफाश, चौघांना चोप

ठाणे : एका मराठी अभिनेत्रीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्यांची चांगलीच धुलाई केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मनसेचे अमेय खोपकर यांनी या प्रकरणाचे व्हिडीओ आपल्या फेसबूकवर पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली आहे. अमेय खोपकर यांनी सांगितले की, मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला आणि सांगितले की एका कास्टिंग डायरेक्टरने मला फोन केला होता. तुला एका हिंदी सिनेमात कास्ट केलं आहे आणि जर तुला मुख्य भूमिका हवी असेल तर उद्या प्रोड्युसर लखनऊ येथून मुंबईत येणार आहेत. त्यांना तुला खूश करावे लागेल मग तुला मुख्य भूमिका मिळेल. असं या अभिनेत्रीला सांगण्यात आल्याचं खोपकर म्हणाले.



या अभिनेत्रीने घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगितलं. कुटुंबीयांनीही मनचिसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर, मला याबाबत माहिती मिळाली. मी ताबडतोब त्यांना ट्रॅप करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका फार्महाऊसवर ही अभिनेत्री आरोपींसोबत गेली त्यावेळी मनसेचे पदाधिकारी त्यांच्या मागावर होते. मनसे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव या चौघांना पकडून चांगलीच धुलाई केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान, त्या मुलीने दाखवलेल्या हिंमतीमुळेच हे शक्य झालं, तिच्या हिंमतीला सलाम... असे म्हणत घडला प्रकार अमेय खोपकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे. तसेच, संबंधित व्यक्तींना मनसैनिकांनी केलेल्या मारहाणीचेही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियातून शेअर केले आहेत.



 
 
 

Comments


bottom of page