top of page

महापुरामुळे बाधित झालेल्या ६४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत

३६३ गावातील वीजपुरवठा सुरु ; ५९ गावे बाकी

सातारा - महापुरामुळे बाधित झालेल्या ८१ हजार ६१७ वीज ग्राहकांपैकी ६४ हजार ९७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण यंत्रणेला यश आले आहे. बंद असलेल्या १७ हजार ५२० ग्राहकांमध्ये १० हजार ५२४ शेतीपंप ग्राहकांचा समावेश आहे. पावसाने थोडी उसंत दिली असली तरी दरडीमध्ये वाहून आलेल्या गाळामुळे कोसळलेले खांब उभे करताना वीज कर्मचाऱ्यांना बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. पावसाने उघडीप दिल्यास उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठाही युद्धपातळीवर सुरळीत करण्यास महावितरण प्रयत्नशील आहे.

ree

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे आपत्कालिन परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला गती देत आहेत. विजेचे साहित्य व मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात दिल्यामुळे वीजपुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत करण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे व मुख्य अभियंता सुनील पावडे परिस्थिती हाताळताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचीही काळजी घेत आहेत.

ree

सातारा जिल्ह्यात महापुराच्या संकटाचा ७ उपकेंद्रांना फटका बसला होता. त्यातील ५ उपकेंद्र दोन दिवसांत सुरु झाली. तर बंद असलेल्या रासाटी व मरळी उपकेंद्रांवर अवलंबून असलेला भाग इतर उपकेंद्राशी जोडल्याने बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण ४२२ गावांचा वीजपुरवठा विस्कळित झाला होता. सोमवारी (दि. २६) दुपारपर्यंत ३६३ गावे सुरु झाली. तर ५९ गावांच्या वीजपुरवठ्याचे काम सुरु आहे. बहुतांश गावे दुर्गम भागात असून, यामध्ये छोट्या-छोट्या वस्त्यांचाही समावेश आहे. यात पाटण तालुक्यातील जवळपास २० गावे आहेत.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिकच्या ६५ हजार ग्राहकांपैकी ५९ हजार ७४ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु झाला आहे. तर शेती व इतर १५ हजार ४०५ ग्राहकांपैकी ४८५१ ग्राहकांचा अशा एकूण ६४ हजार ९७ ग्राहकांचा वीजपुरवठा आज रोजी सुरळीत झालेला आहे. परिणामी आपत्तीग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे ऊर्जामंत्र्यांकडून कौतूक

प्रलयात महावितरणची वितरण यंत्रणा काही ठिकाणी पाण्यात बुडाली. अनेक भागात तारांसह विजेचे खांब जमीनदोस्त झाले. प्रतिकूल वातावरणात डोंगर दऱ्यातून अवजड खांब, रोहित्रे व इतर अवजड साहित्य अंगा-खांद्यावर वाहून नेत महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल त्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच नागरिकांतूनही वीज कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


 
 
 

Comments


bottom of page