top of page

महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्‍यांचे अर्ज घेण्यास पुन:श्च सुरवात

चंद्रपूर : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.

ree

सन 2021-22 करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये ज्या शेतकर्‍यांनी सन 2020-21 मध्ये महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केला आहे. परंतु त्यांची कोणत्याही योजनेसाठी निवड झाली नाही ते शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतील. असे अर्ज सन 2021-22 करिता ग्राह्य धरले जातील. त्याकरिता त्यांच्या कडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही.सन 2021-22 करिता वरील अर्जातील ज्या बाबींकरिता अर्ज केलेला नाही त्या बाबींचा अर्जामध्ये विनाशुल्क समावेश करता येईल.


महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे..


महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/हे संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.


सदर कामासाठी आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Comments


bottom of page