top of page

शेतकऱ्यांनी अनुदानावर बियाणे योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ मे पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा

एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ

शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱयांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर १५ मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

ree

सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' सदराखाली शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबींकरीता शेतकरी या पोर्टलचा उपयोग करू शकतात .

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' शिर्षकांतर्गत 'बियाणे' घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोयाबिन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर १५ मे २०२१ पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक / लॅपटॉप / टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतील.

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणीत करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी. नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमुद करून योजनेसाठी अर्ज करावा. अन्यथा त्यांना अनुदानाचे वितरण होणार नाही.


आधार नोंदणीसाठी शेतकरी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात. कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ईमेलवर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.


 
 
 

Comments


bottom of page