top of page

रशियाचं लुना २५ यान चंद्रावर कोसळलं; जगाचं लक्ष आता भारताच्या चंद्र मोहिमेकडे

रशियाचे लुना-२५ हे यान चंद्रावर कोसळलं असल्याची माहिती रशियन अंतराळ संशोधन संस्था रोस्कोसमॉसने दिली आहे. तब्बल ४७ वर्षानंतर रशियाने चंद्रमोहिम हाती घेतली होती. मात्र, ही चंद्रमोहिम अयशस्वी ठरली आहे. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्याचं रशियाचं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे जगाचं लक्ष आता भारताच्या चंद्र मोहिमेकडे लागलं आहे.

ree

११ ऑगस्ट रोजी 'लूना २५' यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. अवघ्या ५ दिवसांमध्ये 'लुना-२५' चंद्राच्या कक्षेत पोहोचलं होतं. २१ ऑगस्टला लूना २५ हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार होतं. मात्र त्यापूर्वी शनिवारी यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. यानंतर हा बिघाड दुरुस्त कऱण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्यातच हे लँडर चंद्रावर कोसळलं असल्याचं रशियाने सांगितलं.


यानावरील इंजिन सुरु करत दिशा बदल करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. मात्र, इंजिनाचे प्रज्वलन झालं नसल्याची माहिती रशियाने जाहीर केली होती. यातच आता लुना-२५ हे यान चंद्रावर कोसळल्याची माहिती रशियन अंतराळ संस्थेने दिली आहे.

'लूना २४' या मोहीमेनंतर तब्बल ४७ वर्षांनी रशियाने ही चांद्रमोहीम राबवली होती. यामुळेच लूना २५ कडून रशियाला मोठ्या आशा होत्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचं अस्तित्व शोधून, त्याठिकाणी पुढील एक वर्षांपर्यंत संशोधन करण्याच्या उद्देश्याने लूना-२५ चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं.




 
 
 

Comments


bottom of page