top of page

कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रलंबित पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

नांदेड :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र 11 हजार 500 शेतकऱ्याची सातवी यादी 1 जानेवारी 2021 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 7 हजार 681 शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आधार प्रमाणिकरण केले नाही. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार नाही. आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले आहे.

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने "महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019" ही 27 डिसेंबर 2019 च्या शासननिर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2019 रोजी रुपये 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्यावी.

नांदेड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकी बँकांनी 2 लाख 7 हजार 36 शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. सदर बँकांनी अपलोड केलेल्या माहितीपैकी शासनाने कर्जमाफी पात्र असणाऱ्या 1 लाख 94 हजार 216 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 86 हजार 535 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केली आहे. आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेल्या शेतकऱ्यापैकी 1 लाख 79 हजार 628 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम 1 हजार 229.22 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हा व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्याव्यात असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले आहे.

 
 
 

Comments


bottom of page