top of page

... माफी नाही... त्यांना किंमत मोजावी लागेल; अमेरिकेचा दहशतवाद्यांना इशारा

काबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. ही जखम आम्ही विसरणार नाही. आम्ही प्रत्येक दहशतवादी शोधून काढू आणि त्यांना वेचून ठार मारू, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

ree

गुरुवारी काबूल विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 10 अमेरिकन कमांडोंसह 64 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. ISIS या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्यो बायडेन भावूक झाल्याचे दिसले. त्यांनी प्रथम शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर दहशतवादी संघटनेच्या विरोधात मोहीम जाहीर केली.

आम्ही माफ करणार नाही. ही जखम आम्ही विसरणार नाही. आम्ही दहशतवाद्यांचा शोध घेऊ आणि त्यांना वेचून ठार करू आणि त्यांना या मृत्यूंची किंमत मोजावी लागेल, असा इशारा बायडेन यांनी दिला. या हल्ल्याला अफगाणिस्तानातील अमेरिकेचा सर्वात वाईट दिवस असल्याचे सांगत अमेरिकन अध्यक्ष बायडेन म्हणाले की, ज्यांनी निरपराध लोकांना मारले त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. काबूल विमानतळावर अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक अजूनही उपस्थित आहेत. तालिबानने अंतिम मुदत निश्चित केली असेल, परंतु बचावकार्य सुरूच राहील, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.



 
 
 

Comments


bottom of page