top of page

JioPhone Next : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा; १० सप्टेंबरला होणार लाँच

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी केली घोषणा

ree

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक सभेमध्ये रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भारतात JioPhone Next ची घोषणा केली आहे. “जियो फोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात स्वस्त फोन असणार आहे, भारताला टूजी मुक्त करायचं असेल, तर सर्वांना परवडेल अशा खऱ्या अर्थाने स्वस्त स्मार्टफोनची गरज आहे. त्या आधारावर जिओ आणि गुगल यानी मिळून जिओ फोन नेक्स्ट तयार केला आहे." असं यावेळी बोलताना अंबानी यांनी सांगितले. १० सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी JioPhone Next हा फोन लाँच केला जाईल, असं मुकेश अंबानी यांनी यावेळी जाहीर केलं.

जिओ आणि गुगलने संयुक्तपणे हा फोन तयार केला असून या फोनसाठी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचं ऑप्टिमाईज्ड व्हर्जन तयार करण्यात आलं आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड, गुगल आणि जिओचे सर्व मोबाईल अॅप्लिकेशन्स युजर्सला वापरता येणार असून इतर स्मार्टफोन फीचर्सप्रमाणेच या फोनमध्ये अनेक फीचर्स असणार आहेत, अशी माहिती यावेळी मुकेश अंबानी यांनी दिली. दरम्यान, या फोनची किंमत जाहीर करण्यात आली नसली तरी लवकरच ती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये व्हॉइस असिस्टन्स, ऑटोमॅटिक रीड अलाऊड, स्मार्ट कॅमेरा असे फीचर्स असणार आहेत. JioPhone Next आधी भारतात लाँच केला जाईल आणि नंतर जगभरातल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.


 
 
 

Comments


bottom of page