top of page

'माझ्यामुळे लोकांचे मूड ऑफ झाले, पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे' स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

‘माझ्यामुळे लोकांचे मूड ऑफ झाले, पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला. काही लोकांच्या मनावर, अनेकांच्या डोक्यात अधिराज्य केले आणि मित्रपरिवार छान लाभला. माझे आई-वडील दुनियेतील खूप छान देवमाणूस आहेत. पुढचा जन्म त्यांच्या पोटी व्हावा, ही देवाला प्रार्थना करतो आणि मी कोणालाही यास जबाबदार समजत नाही. कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल, तर माफी मागतो. मला माफ करा,’ असे व्हाॅसअपवर स्टेटस ठेवून २९ वर्षीय विवाहीत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

ree

याबाबत अधिक माहिती अशी, जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरातील सद्‌गुरूनगर येथे प्रेमनाथ महाजन हे कुटूंबासह राहतात. त्यांचा मुलगा हर्षल महाजन (वय २९) खासगी कंपनीत कामाला असून चार महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते. परंतू काही दिवसापूर्वी पत्नी सोबत वाद झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यामुळे काही दिवसापासून हर्षल नैराश्यात गेला होता.

मंगळवारी रात्री १० वाजता आई वडिलांसह जेवण करून हर्षल हा झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असताना हर्षलने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटेसाडेचारच्या सुमारास वडील प्रेमनाथ महाजन यांनी हर्षलच्या खोलीत बघीतले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे दृष्य पाहून कुटूंबाला मोठा धक्काच बसला. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरविला व जिल्हा रुग्णालयात रवाना केला. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हर्षल महाजन याला मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. हर्षलने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवर पहाटे 2 वाजून 22 मिनिटांनी व्हॉटस्ऍपवर स्टेटस ठेवले. 'माझ्यामुळे लोकांचे मूड ऑफ झाले, पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे' असे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते. त्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी मोबाईल तपासला असता ही बाब समोर आली आहे.


 
 
 

Comments


bottom of page