top of page

... थेट गृहमंत्र्यांवर फडणवीस यांनी दाखल केला हक्कभंग!

देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी (काल) विधानसभेत केला होता. त्यानंतर मोठा गदारोळ झाला. आता यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग आणला आहे. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात देखील देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

ree

विधान भवन, मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणात काल काही आरोप केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदवले आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप करून सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अवमान केला आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दिसून येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय ही बाब आपण काल निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा ते वारंवार तेच बोलत राहिले. असे करून अनिल देशमुख यांनी माझ्या बोलण्यावर बंधने आणून माझा विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात केली आहे”.


दरम्यान, अशोक चव्हाण यांच्याविरोधात देखील देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. “मराठा आरक्षणावर आज अशोक चव्हाण यांनी अतिशय दिशाभूल करणारे निवेदन सभागृहात केले. १०२ व्या घटनादुरुस्तीचा उल्लेख हा सर्वोच्च न्यायालयात मुकुल रोहतगी यांनी केला होता. केंद्र सरकारच्या वतीने अटर्नी जनरल यांनी जे सांगितले नाही, ते त्यांनी सभागृहात सांगितले. १०२ व्या घटनादुरुस्तीचा महाराष्ट्राच्या कायद्यावर परिणाम होणार नाही, हे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यावर २ पाने लिहिली आहेत. मात्र या सर्व बाबी विचारात न घेता अशोक चव्हाण महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

 
 
 

Comments


bottom of page