top of page

सहलीला गेलेल्या ४ मित्रांचा बुडून मृत्यू

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झल्यानंतर प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतर नागपुरातील काही युवक वाकी परिसरात सहलीला आले होते. वाकी परिसरात सहलीला आलेल्या नागपूर येथील चार मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कन्हान नदीपात्रातील डेंजर डोहात मंगळवारी घडली. एकाचा मृतदेह सापडला असून अन्य तिघांचा शोध घेतला जात आहे. परिसरात पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात मोठी अडचण येत आहे.

ree

तौफीक खान (वय - १६), प्रविण गलोरकर (वय - १७ ), अवेश शेख (वय - १७ ) आणि आरिफ अकबर पटेल (वय - १६ ) अशी नदीत बुडून मृत्यू झालेल्या चार मित्रांची नावे आहेत. या चौघांसह तेजू पोटपसे (वय - २०), थायान काजी (वय - १८), पलाश जोशी (वय - २०), विशाल चव्हाण (वय - २५) हे अन्य चौघेही वाकी येथे सहलीसाठी गेले होते.

या सर्व मित्रांना सहलीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर द्वारका वॉटर पार्क बंद असल्याचे दिसले. यामुळे त्यांनी परिसरातल्या कन्हान नदीच्या पात्रात फिरायला जाण्याचे ठरवले. आठही जण गाडीने कन्हान नदी पात्राच्या दिशेने गेले. नदीजवळ पोहोचताच चौघांना पोहायचा मोह आवरला नाही. त्यातील आठ पैकी हे चौघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने खोल पाण्यात गेल्याने ते बुडू लागले. सोबतच्या अन्य मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचा जीव वाचवता आला नाही.

घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने चौघांच्याही मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र परिसरात पाऊस सुरू असल्याने शोध कार्यात अडथळे निर्माण झाले. बुडालेल्या चौघांपैकी अवेश शेख याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.


वाकी येथील कन्हान नदीच्या पात्रात खोलगट डोह आहे. या डोहात बुडून अनेकांचा मृत्यू झालाअसल्यामुळे या ठिकाणी पोहण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. याची माहिती देणारे सूचना फलक सुद्धा लावण्यात आला आहे. मात्र, बरेच युवक फलकाकडे दुर्लक्ष करतात आणि पाण्यात उतरतात. यामुळे अशा घटना सातत्याने घडतात. 

 
 
 

Comments


bottom of page