top of page

शेतात काम करणाऱ्या महिलेच्या डोक्यात दगड घालून हल्ला

Feb 26, 2022
1 min read

पुणे : पिंपरी परिसरात एका अज्ञात महिलेनं शेतात काम करणाऱ्या महिलेच्या डोक्यात दगड घालून हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर आरोपी महिनेले पीडित महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेतला जात आहे.


पिंपरी परिसरातील पुनावळे येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादी महिला आपल्या शेतात काम करत होती. यावेळी एक अनोखळी महिला शेतात आली. यावेळी तिने चोरी करण्याच्या उद्देशानं फिर्यादी महिलेच्या डोक्यात दगड मारून फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ ओढण्यासाठी गळाही आवळला. पण फिर्यादी महिलेनं जिवाच्या आकांताने आरोपी महिलेचा प्रतिकार केला. त्यामुळे घाबरलेल्या आरोपी महिलेनं घटनास्थळावरून काढता पाय घेतला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेनं हिंजवडी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. गळ्यातील सोन्यासाठी अज्ञात महिलेनं महिलेच्याच डोक्यात दगड घातल्याचा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 
 
 

Comments


bottom of page