top of page

Video: ….अन् एकनाथ शिंदे स्टेजवरच अभिनेत्याच्या पाया पडले

मुंबई: धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपानं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मीडियावर 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटातील गाण्याचा लाँचिंग सोहळा मुंबईमधील वरळी येथील ब्लू सीज या हॉटेलमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित गुरुवारी पार पडला. यावेळी आनंद दिघे यांच्या लूकमधील प्रसाद ओकला पाहून एकनाथ शिंदे भारावून गेले. आणि व्यासपीठावर सर्वांदेखत प्रसाद ओकच्या ते पाया पडले. हा प्रसंग सर्वांनाचा भावूक करून गेला.

दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च गुरुवारी मुंबईत पार पडलं.

या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर अनेकांनी प्रसादच्या या लूकचं कौतुक केलंय. विशेष म्हणजेच प्रसादचा हा लूक पाहून आनंद दिघेंना राजकीय गुरु मानणारे एकनाथ शिंदेही भारवून गेल्याचं पहायला मिळालं. त्यामुळेच आनंद दिघेंप्रमाणे खांद्यावर रुमाल टाकून प्रसाद जेव्हा आनंद दिघेंच्या लूकमध्येच म्युझिक लॉन्चसाठी मंचावर पोहोचला तेव्हा एकनाथ शिंदे वाकून प्रसादच्या पाया पडले. अभिनेता प्रसाद ओकने हुबेहूब साकारलेल्या पडद्यावरील आनंद दिघेंचे रूप पाहून एकनाथ शिंदे देखील भावूक झाले.


Video:पाहा

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक शिवसैनिकांनी यामधून एकनाथ शिंदेंनी त्यांच्या राजकीय गुरुबद्दलचा आदर अनोख्या पद्धतीने व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर प्रसादनेही आनंद दिघे ज्याप्रमाणे खांद्यावर हात ठेऊन कार्यकर्त्यांसोबत फोटो काढायचे तसाच फोटो एकनाथ शिंदेंसोबत काढला.


 
 
 

Comments


bottom of page