top of page

धोनीने पुन्हा दाखवून दिले....; चेन्नई सुपर किंग्ज फायनलमध्ये

दुबई: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. याही सामन्यात महेंद्रसिंह धोनीने फिनिशरची भूमिका बजावली. चौकार ठोकत धोनीने चेन्नई सुपर किंग्जला विजयी केले. या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज नवव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचली आहे.

ree

पहिल्या क्वॉलिफायरमध्ये महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली. दिल्लीच्या पृथ्वी शॉने पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ केला. दिल्लीने ३.१ षटकात ३६ धावा केल्या होत्या. शिखर धवन, श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाल्याने दिल्लीची अवस्था २ बाद ५० अशी झाली. चौथ्या स्थानावर अक्षर पटेलला मोईन अलीने १० धावांवर बाद केले. एका बाजूने पृथ्वीने २७ चेंडूत अर्धशतक केले. त्याने ३४ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ६० धावा केल्या. जडेजाने त्याला बाद केले.

त्यानंतर दिल्लीची कर्णधार ऋषभ पंत आणि हेटमायर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी करत दिल्लीला मजबूत धावसंख्या उभी करुन दिली. ऋषभ पंतने ५१ तर हेटमायर ३७ धावा केल्या. दिल्लीने २० षटकात ५ बाद १७२ धावा केल्या. चेन्नईकडून हेजलवुडने सर्वाधिक २ तर जडेजा, मोईन अली आणि ब्रावो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

१७२ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली.पहिल्याच षटकात डु प्लेसिलला क्लीन बोल्ड करत दिल्लीने चेन्नईला पहिला धक्का दिला त्यानंतर मात्र ऋतुराज गायकवाड -रॉबिन उथप्पाने ११० धावांची भागीदारी करत चेन्नईला सुस्थितीत पोहोचवले, १४ व्या षटकात रॉबिन उथप्पा ६३ धावांवर बाद झाला. तेव्हा चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी ६० धावांची आवश्यकता होती. दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्तम मारा करत चेन्नईला संकटात टाकले होते. शेवटच्या क्षणी धोनीने ( ६ चेंडूत १८ धावा) चौकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला. ऋतुराज गायकवाडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.


 
 
 

Comments


bottom of page