top of page

मधुचंद्राच्या दिवशी पतीची अजब अट; पतीवर गुन्हा दाखल


मधुचंद्राच्या दिवशी पतीने पत्नीला अजब अट घातली. त्यानंतर सासरच्यांनीही तिला त्रास देण्यास सुरुवात केली. आई-वडिलांचा आदर आणि समाजाच्या भीतीपोटी पीडित पत्नीने याबाबत तिने कुठे वाच्यता केली नाही. ती अन्याय सहन करत राहिली. पण सहनशीलतेचा अंत झाल्याने तिने थेट पोलीस पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती आणि सासरच्या अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

ree

पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील पोटका भागातील ही घटना आहे. पल्लवी मंडल या विवाहितेच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. १८ जून २०१८ रोजी जयमाल्य मंडल याच्याशी पल्लवीचा सर्व रितीरिवाजांनुसार विधीवत विवाह झाला. मात्र, मधुचंद्राच्या रात्रीच पल्लवीकडे जयमाल्य याने अजब अट घातली. दोन वर्षांच्या आत तू यूपीएससी परीक्षा पास हो आणि आयएएस अधिकारी बनवून दाखव तरच तुझ्यासोबत मी संसार थाटेन नाहीतर दोन वर्षांनी आपलं पती-पत्नी म्हणून नातं संपुष्टात येईल, असे जयमाल्य याने पल्लवीला सांगितले. सुरुवातीला पल्लवीने ही बाब गंभीरपणे घेतली नाही. सगळं काही सुरळीत होईल, असं तिला वाटलं. तिचा पतीने तिच्याशी बोलणं बंद केलं, सासरच्यांनीही तिला त्रास देण्यास सुरुवात केली. ती हा त्रास सहन करत राहिली. मात्र तीन वर्षे झाली तरी त्रास थांबत नसल्याने व पतीचा हट्ट कायम असल्याने अखेर पल्लवीचा संयम सुटला आणि तिने पती व सासरच्या मंडळीविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या घरचेही तिच्यासोबत उभे राहिले आहेत. न्यायासाठी पल्लवी सध्या पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या चकरा मारत आहे.

जयमाल्य मंडल हा एमबीए गोल्ड मेडलिस्ट आहे. सध्या सिटी युनियन बँकेत तो सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून सेवेत आहे. त्याचा हा प्रताप समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. एका उच्चशिक्षित व्यक्तीने पत्नीला अशाप्रकारची अट घातल्याने हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.



सासरच्या लोकांनी आधीच अशी अट ठेवली असती तर मी या लोकांसाठी माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ दिले नसते. सर्व लोक सुशिक्षित असूनही अशिक्षित आहेत. 
-  प्रदूत कुमार मंडल ( पल्लवीचे वडील )


 
 
 

Comments


bottom of page