top of page

कोरोनाचा कहर : १३ तासात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

कोरोनाने देशभर थैमान घातले असून परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनामुळे अख्ये कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. कोरोनामुळे १३ तासात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना शिराळा तालुक्यातील शिरसी येथे मंगळवारी घडली. सहदेव विठ्ठल झिमूर (वय ७५), त्यांची पत्नी सुशीला (६६) आणि मुलगा सचिन (३०) अशी मृतांची नावे आहेत.

ree

शिरसी गावातील सहदेव झिमूर (वय 75) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या २२ दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची पत्नी सुशीला यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांचा मुलगा सचिन मुंबई येथे खासगी कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता आहे. लॉकडाऊन असल्याने दीड महिन्यांपूर्वी तो गावी आला होता. आई-वडिलांपाठोपाठ तोही बाधित झाल्याने त्याला आईसह त्याच रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.


तब्येतीत सुधारणा झाल्याने सहदेव झिमूर दोन दिवसांपूर्वी घरी आले होते. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने मंगळवारी (दि. १८) पहाटे पाचला त्यांचा मृत्यू झाला. सहदेव यांचा मृत्यू होऊन बारा तास होतात तोच सायंकाळी पाचच्या दरम्यान पत्नी सुशीला यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची लगबग सुरू असतानाच तासाभरात सायंकाळी सहाला सचिनचाही मृत्यू झाला. तेरा तासात बघता-बघता एक कुटुंब संपले.


 
 
 

Comments


bottom of page