top of page

विधानपरिषद निवडणुकीत भाजपची बाजी; चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल विजयी

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी मुंबईतल्या दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या चार जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या, तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. नागपुरातुन चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला मतदारसंघातून वसंत खंडेलवाल हे विजयी झाले.

ree

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झाली. या निवडणुकीत १० डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले. ९८.९३ टक्के मतदान झाले होते. एकूण ५६० पैकी ५५४ मतदारांनी मताधिकार बजावला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली तर मंगेश देशमुख यांना 186 मतं मिळाली आहेत. मात्र, काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना अवघं एक मत मिळालं आहे, तर 5 मतं अवैध ठरली.

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले होते. ८२२ मतदारांपैकी ८०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. गोपिकिशन बाजोरिया यांना 334, वंसत खंडेलवाल यांना 443 मतं मिळाली. तर 31 मतं बाद झाली आहेत.शिवसेनेचे बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा येथील पराभवामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.



 
 
 

Comments


bottom of page