top of page

Video: आमदाराच्या मुलीची सिग्नल तोडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी; व्हिडीओ व्हायरल

वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी थांबवल्यानंतर आमदाराच्या मुलीने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केली. त्याचबरोबर यावेळी तिने आपण कोण आहोत हे सांगत पोलिसांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

भाजपा आमदार अरविंद निंबावली यांची मुलगी बीएमडब्ल्यू चालवत होती. यावेळी तिने वाहतूक नियमाचं उल्लंघन करत सिग्नल तोडला. त्यानंतर पोलिसांनी तिला थांबवलं असता मुलीने पोलिसांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तिने आपण कोण आहोत हे सांगत पोलिसांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. “मला जायचं आहे, कार थांबवू नका, ओव्हरटेक केल्याबद्दल तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करु शकत नाही. ही आमदाराची गाडी आहे. आम्ही बेदरकारपणे चालवत नव्हतो. अरविंद निंबावली माझे वडील आहेत,” असं मुलगी पोलिसांना सांगत होती. यावेळी तिने स्थानिक पत्रकार आणि कॅमेरामनसोबतही हुज्जत घातल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

आतापर्यंत मुलीच्या नावे ९ हजाराचा दंड जमा झाला होता. यासोबत आताचे १००० रुपये असा एकूण १० हजारांचा दंड तिला भरण्यास सांगण्यात आले असता तिने आपल्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. पण शेवटी तिच्यासोबत असणाऱ्या मित्राने १० हजारांचा दंड भरला आणि त्यानंतर पोलिसांनी तिला जाऊ दिलं. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


 
 
 

Comments


bottom of page