top of page

देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा ; २८ बँकांना २२ हजार कोटींचा गंडा, सीबीआय कडून गुन्हा दाखल

Updated: Feb 13, 2022

बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एबीजी शिपयार्ड या कंपनीने देशातील आघाडीच्या २८ बँकांची तब्बल २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्डचे तत्कालीन संचालक ऋषी अग्रवाल, संथनम मुथुस्वामी आणि अश्विनी अग्रवाल या तिघांसह कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ree

एबीजी शिपयार्ड ही एबीजी समूहातील प्रमुख कंपनी असून जहाज बांधणी आणि जहाजांची दुरुस्ती यात ही आघाडीची कंपनी मानली जाते. गुजरातमधील सुरत आणि दहेज येथे या कंपनीचे प्लांट असून कंपनीच्या संचालकांनी तब्बल २८ बँकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकिंग क्षेत्रातील आजवरचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ दरम्यान हा घोटाळा करण्यात आला आहे. याबाबत ८ नोव्हेंबर २०१९ रोजी बँकेने केलेल्या तक्रारीनंतर चौकशी केली असता या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. त्यानंतर १२ मार्च २०२० रोजी सीबीआयने काही बाबतीत स्पष्टीकरण मागितले होते. त्याचवर्षी ऑगस्ट महिन्यात नव्याने गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली होती. जवळपास दीड वर्षे विविध पुराव्यांची पडताळणी केल्यांतर सीबीआयने आता तत्कालीन तीन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बँकांकडून ज्या कारणासाठी कर्ज घेण्यात आले त्यासाठी त्याचा वापरच केला गेला नसल्याचे व ही रक्कम अन्यत्र वळवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. संचालकांनी संगनमत करून बँकांची फसवणूक केल्याचे सबळ पुरावे हाती लागल्याने कारवाईचे पुढचे पाऊल उचलले गेले आहे.

एबीजी शिपयार्डने स्टेट बँकेकडून २ हजार ९२५ कोटींचे कर्ज घेतले होते तर आयसीआयसीआय बँकेकडून ७ हजार ८९ कोटी, आयडीबीआय बँकेकडून ३ हजार ६३४ कोटी, बँक ऑफ बडोदाकडून १ हजार ६१४ कोटी, पीएनबीकडून १ हजार २४४ कोटी आणि आयओबीकडून १ हजार २२८ कोटी इतके कर्ज उचलले असून हे कर्ज बुडवण्यात आले आहे.






 
 
 

Comments


bottom of page