top of page

बघ्यांच्या गर्दीने केला घात; ३० हुन अधिकजण पडले विहिरीत, चौघांचा मृत्यू

भोपाळ - मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातीस गंजबासौदा भागातील लाल पठार परिसरामध्ये ३० ते ४० जण विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या आणि राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम घटनास्थळी रवाना झाल्या आणि त्यांनी मदतकार्य सुरु केलं. दरम्यान आतापर्यंत ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या २५ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालक मंत्री विश्वास सारंग स्वत: या ठिकाणी रात्रीपासून उपस्थित असून मदतकार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी विदिशा जिल्ह्याच्या गंजबासौदा भागातील लाल पठार परिसरामध्ये गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास एक मुलगा इथल्या एका विहिरीमध्ये पडला. त्यावेळी त्या मुलाला वाचवण्यासाठी परिसरातील काही लोकांनी विहिरीत उडी टाकली. तर काही लोक त्या विहिरीच्या कडेवर उभे राहून ही घटना पाहत होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आणि ते ‘बचावकार्य’ बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं या विहिरीभोवती गर्दी झाली. विहिरीभोवती बांधण्यात आलेल्या कठड्यावरून वाकून वाकून सर्व लोक विहिरीत पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न बघत होते. मात्र, हा भार विहिरीच्या कठड्याला पेलवला नाही आणि अचानक कठडा खचला. कठडाच ढासळल्यानंतर त्याला रेटून उभे असलेले अनेकजण एकाच वेळी ४० हून अधिक जण पडले विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून २५ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

ree

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तातडीने डीजीपी, एसडीआरएप, आयजी यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. तसेच, आपण स्वत: बचावकार्यावर लक्ष ठेऊन आहोत, असं देखील चौहान यांनी स्पष्ट केलं आहे. रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करण्यात अनेक अडचणींचा सामना बचाव पथकाला करावा लागला. दरम्यान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले.


 
 
 

Comments


bottom of page