top of page

भिडेवाड्याचा विकास करून मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार – छगन भुजबळ

पुणे : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ree

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्यप्रदेशचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, माजी आमदार पंकज भुजबळ, दिप्ती चौधरी, कमल ढोले पाटील, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा जपण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.

बघेल म्हणाले, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले समाजसुधारणेचे कार्य महत्वपूर्ण आहे. समाजातील वंचित, मागास घटकासाठी त्यांनी कार्य केले. महिलांना समाजात सन्मान मिळावा, शेतकरी सुखी व्हावा याबाबतचा त्यांनी केलेले कार्य आजही तेवढेच महत्वपूर्ण ठरते. अशा महापुरुषांच्या नावाने सन्मान होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. बघेल व अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी फुले वाड्यात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. महात्मा फुले समता पुरस्काराने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा गौरव करण्यात आला.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा जागेचे भूमिपूजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन केले. यावेळी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, मध्यप्रदेशचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, बापूसाहेब भुजबळ, मंजिरी धाडगे, नगरसेविका मनीषा लंडकत उपस्थित होते.


 
 
 

Comments


bottom of page